Thursday 15 December 2011

गुंतता हृदय हे.............

 
 
 
 
 
 
 
गुंतता हृदय हे ....अस आणि अस कितीतरी आपण आपल्या मनाचे धागे बांधत असतो ...कित्येक व्यक्ती रोजच्या आयुष्य पटलावर  येत असतात , जात असतात ..काही मनाच्या तळ्याशी थांबतात ..वाटसरू होतात ..काही घडीचे डाव मांडतात ...काही आपली तहान भागवतात आणि आपल्यालाच कोरड ठेवून निघून जातात ..काही चिवचीवतात  तर काही धुंद सुरांनी भारावून टाकतात ...काही आपल्यात स्वताचे प्रतिबिंब पाहतात आणि काही आपल्याला त्यांच्यातच आपल प्रतिबिंब पाहण्याची मोहिनी घालतात ..हे मन कधी  गुंतत ..कधी हरवत ..कधी बेभान होत ..कधी मोहाच्या चार क्षणांना भुलत ..कधी खोल गर्तेत जात ..तर कधी लहान मुलाच्या अल्लडपनालाही मागे टाकत ,इतक उथळ आणि अवखळ होऊन जात ...मन गुंततच जात .....गीतकार गुरु ठाकूरचे " मन उधान वाऱ्याचे"  ऐकताना मनाच्या साऱ्या छटा अशा सामोरी येतात आणि मग मन पुन्हा पुन्हा त्या शब्दात गुंतून राहत ....
आयुष्यात येणारी नाती हि अशीच काही ..काही रक्ताची म्हणून हक्काने येणारी आणि काही मन गुन्तलय  म्हणून सोबत करणारी ..काही विधात्याने ठरवलेली तर काही अनपेक्षित पणे समोर आलेली ...काही चौकटीत हट्टाने बसणारी ..काही आपण हट्टाने बसवलेली आणि काही चौकटीपलीकडची  ..हवी हवीशी ...
कधी कधी मन हे खुळ्यागत वागत ...नसलेल्या गोष्टीच त्याला हव्याश्या असतात ...चौकटीच्या पलीकडच्या नात्यातच ते कधी कधी पार रमून जात इतक कि वास्तवाचं त्याला भानच राहत नाही ..किती सारे रंग ..आठवणी ...क्षण हे मन या नात्यात गुंतवत आणि मग एका क्षणी केवळ हे नात समाजमान्य नाही म्हणून मागे फिरत ..त्या नात्याचा तळ न ओलांडताच ..सारे बंध ..सारा आवेग  मागे ठेवून ..
पण मग हे नात तकलादू असत ? यात खऱ्या भावना नसतात का ? जे प्रेम ..जे क्षण उधळले ते सार आभासी , खोट, फसव  असत का ? समाजमान्य नात तितक खर आणि हे मात्र खोट अस होऊ शकत का ? नाही होऊ शकत.. हेही नातच तितकच उत्कट असत जितक निर्मळ मनाची साद ...पण या नात्याला शेवट नाहीय आणि असलाच तर तो सुखद असेलच अस नाहीय ....
तरीही हृदय गुंतत ...पुन्हा पुन्हा गुंतत ....
 
अस्मी

No comments:

Post a Comment